Sunday 1 April 2018

कृतीयुक्त विश्वास - ज्ञानेश्वर मिस्तरी



🅿1⃣🍂🅿1⃣🍂🅿1⃣🍂🅿1⃣

⚜ प्रेरणा एक सुवर्णपान - 19⚜

कृतीयुक्त विश्वास - ज्ञानेश्वर मिस्तरी

     घरची परिस्थिती  खूप गरिबीची होती. लहानपणी वडील आजारी असायचे.त्यामुळे कुठला हट्ट करता येत नव्हता.आजारी असतांनाही वडील घरी सुतारकाम करायचे व आई शेतात जायची.आम्हा तीनही भावंडांची घराची कामे वाटलेली असायची. एकाने भांडी घासणे,पाणी भरणे, झाडू मारणे. लहानपण अन् गरिबी यांची मिसळ आजही जीवनाकडे बघतांना दिशादर्शन करते.

  जून १९९१ मध्ये जि.प. शाळा लोहटार येथे पहिली ते चौथी व पाचवी ते १० वी सुंदरबाई सिताराम मालपुरे माध्यमिक विद्यालय लोहटार येथे शिक्षण झाले. मराठी शाळेत रमेश गुरुजी व ठाकरे गुरुजी यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.माध्यमिक शाळेत सुभाष चौधरी,एन.आर.पाटील (आबा),के,डी.परदेशी,एस.आर.परदेशी,बी.एस.चौधरी,एन.एन.पाटील सर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.अन् तिथेच जीवनाकडे बघण्याचे विकसित विचार रुजविले गेले.

गरिबीची परिस्थिती अन् लहानपणाचे शेतात जाणे हे बहुतेकांना मिळालेलं वरदानच होत असं वाटते.मेहनत अन् संस्काररूपी जीवन जगण्याचे धडे सहज मिळत होते.शाळेला दांडी मारून शेतात आई सोबत कामाला जाणे ठरलेलेच. मी शेतामध्ये दुपारपर्यंतच काम करायचो,कारण मला शेताची ॲलर्जी होती.त्यामुळे माझे काम आईला करावे लागायचे. त्याला नाईलाज होता.शेतात गेल्यावर दुपारुन वांत्या करायचो.आजारी पडायचो.वडील घरी आल्यावर संध्याकाळी माझा चेहरा बघून सांगायचे, "हाऊ पोऱ्या काहीच करु शकणार नाही.येणावर वावरमा काम होत नही.सुतारकाम पण नही व्हणार". मी खूप बारीक होतो. त्यामुळे घरचे सर्वच चिडवायचे.  मी एका कोपऱ्यात जाऊन रडत बसायचो.समाजातील आदर्श व्यक्तींकडे पाहून घरच्यांनाही वाटायचे आम्ही भावडांनी काहीतरी वेगळे करावे.मी ८ वीत असतांना माझ्या आयुष्यातले पहिले सुतारी काम केले.त्यामुळे वडिलांना खूप आनंद झाला आणि गर्व वाटला.पुढे त्यांना त्यांच्या कामात मदत करायचे असे मनाशी ठरविले .

   10 वीनंतर ITI करावे असे वाटले पण जातीचा दाखला नसल्यामुळे 11-12 वी केले.सायकलीवरच दोघं वर्ष पार पाडली.मध्यंतरी भावाने वेल्डींग दुकान टाकले अन् मदत करू लागलो.मित्रांसोबत मौजमस्ती खूप केली.12 वी परीक्षेनंतर वडिलांनी आत्याकडे नाशिकला पाठवून दिले तेही एकटेच. अनुभव श्रेष्ठ गुरू हे कळायला सुरूवात झाली. आयुष्याला कलाटणी द्यायला काही शब्द अन् प्रसंग द्यायला पुरेसे असतात.

      नाशिकला पहिल्यांदा सोबत पॕसेंजर अन् प्रवासी.अॉगस्ट 2003 वर्ष कलाटणी देऊन गेले.अन् सुरू झाला प्रवास.आत्या आणि मामा यांचे संस्कार अन् त्यांच्या घरातला कोपऱ्यात असलेला स्टुल अन् सायकल सोबती होते.दिवसा सायकलीवरून नाशिक पाहणे नित्याचेच होते.मामांना पुढे मुंबईला फर्निचर काम मिळाले. 5-6 महिने तेथेच काम केले.मन लागेना. काहितरी वेगळे करण्याचा विचार मनात पेरला जात होता. काम संपल्यावर पुन्हा नाशिक आलो.

     कंपनीत काम करणे पसंत नव्हते.भाऊकडं वेल्डींग काम केल्याचा फायदा झाला.एका दुकानात काम मिळाले तेथेच मनापासून काम केल्याने खुश होऊन पगार वाढवून दिला.तेथेच चांदवडच्या आयटीआय शिक्षकांचा मोलाचा सल्ला दिला अन् कमवता कमवता आयटीआय करण्याचे स्वप्न पूर्ण करत होतो.

       पुढे कठीण प्रसंग वैयक्तिक जीवनात आले.अन् त्यांनाही सामोरे जात होतो.राहण्याची सोय पुढे दुकान मालकाकडेच झाली अन् मालकाचे दुकान हेच घर झाले होते.पुढे रूम केली हाताने स्वयंपाक करीत होतो.वर्षभर काम केले अन् सोडले.पुढे एक वर्ष महिंन्द्रामध्येही काम केले.आतला आवाज वेगळंच काहीतरी सांगत होता.घरी पैसे देऊन मोकळा व्हायचो.

     जीवनात रिस्क घेणं काहीवेळेस महत्त्वाचे असते.अन् मी ते केले.जुन्या मालकाकडून भाड्याने वेल्डींग मशीन घेऊन काम करू लागलो.टप्प्याटप्प्याने घरोघरी जाऊन काम करू लागलो.ओळख अन् भांडवल वाढू लागले.मूड वेगळाच होता.मध्येच आत्याच्या मुलामध्ये सेंट्रींग काम पार्टनरशीपमध्ये सुरू केले.धंदा जोरात असतांनाच 2 वर्षात विभक्त झालोत.पुढे स्वतःचे वेल्डींग दुकान टाकायचे ठरविले.त्याचकाळात आशाशी लग्न झाले.सायकलीचा प्रवास आता स्कुटरपर्यंत पोहोचला होता.कामाचा वेग वाढला होता.पुढे लोखंडाचे दुकान मित्राच्या मदतीने टाकले.व्यवसाय वाढत होता.दिवसेंदिवस प्रगतीकडे वाटचाल करत होतो.किरण आणि आयुषच्या येण्याने संसार बहरला.अनेक जबाबदाऱ्या वाढत होत्या.अनेक आव्हाने येत होती.लोखंडावर मंदी आल्याने तो व्यवसाय बंद करून पुन्हा एकवीरा फेब्रिकेशन वेल्डींग दुकानावर लक्ष केंदित केले.

   काही क्षण काळजात घर करतात.माझ्या लग्नाच्या काळातील प्रसंग कायम आठवतो.वडील काकांना सांगत होते."आम्ही आडाणी व्हतूत, गरीब व्हतूत, पण मना पोऱ्यानी करी दखाडं, मी कधी सायकल लिधी नही. मना पोऱ्या कार चालाडस.हाऊ गर्व वाटस आमले".(आम्ही आडानी होतो,गरीब होतो,पण माझ्या मुलाने करुन दाखविले. मी कधी सायकल घेऊ शकलो नाही,माझा मुलगा कार चालवतो. ही आमच्यासाठी गर्वाची गोष्ट आहे.) त्यांचे हे शब्द काळजात घुसत होते, उर भरुन आला होता, डोळयांतून अश्रूंना वाट करून दिली होती.

नाशिक मध्ये कुणी आपलं नसतांना बिरसा साहेबांच्या आशिर्वाद व मला दिलेल्या धैर्यामुळे मी अयोध्या मार्केट, सिडको येथे माझा Business चालु केला होता. सद्या नविन बिझनेस म्हणून पार्टनरशिपमध्ये बिल्डरशिप चालू केली आहे.नवीन क्षेत्र खूप आव्हानात्मक अन् अभ्यासपूर्ण करावयाचे आहे हे भान ठेवूनच बेभान होऊन झोकायचे आहे.लहानपणी आम्ही घराजवळ मातीचे घर करायचो.ते स्वप्न आता पूर्ण झालेले होते.त्यामुळे स्वप्नं बघत रहायचे,स्वत:वरील विश्वास,धैर्य व कृतीची जोड त्याला दिल्यास स्वप्न आपोआप पूर्ण होत असतात.*

मला कामाच्या ओघामुळे घरात जास्त लक्ष केंद्रित करता येत नसल्यामुळे घरातील सर्व जबाबदाऱ्या माझी पत्नी आशा सांभाळते. कधी कधी चिडतेसुध्दा पण समजून घेण्याच्या तिच्या चांगल्या गुणामुळे मी यशस्वीपणे माझ्या कामाकडे लक्ष केंद्रित करु शकलोय.मी नाशिकमध्ये घर घेतल्याने आईवडिलांना माझा खूप अभिमान वाटतोय. काहीतरी करण्याची जिद्द उराशी असली पाहिजे.ती असल्यावर काहीच अशक्य नसते.त्याच जिद्दीच्या बळावर मी हे सर्व काही करु शकलो होतो.प्रत्येक माणूस आपल्याला काहीतरी शिकवून जातोय.फक्त आपली शिकण्याची इच्छाशक्ती हवी.न विसरण्यासारखी माणसे आपल्या जीवन प्रवासात खूप कमी असतात. आजपर्यंत मला जे कोणी व्यक्ती भेटले ते मला चांगले काहीतरी शिकवून गेले.सामान्य विचारच असामान्य कार्य करण्यास प्रवृत्त करत असतात.आतला आवाज ऐकत गेलो अन् सारं घडत गेलं.बेरोजगारापासूनचा बिल्डरशिपपर्यंतचा प्रवास आणि भविष्यकालीन वाटचाल सारी प्रेरणा देणारी आहे. माझ्या आयुष्यात आलेल्या,प्रेरणादायी व्यक्तीमत्वांचा ऋणी आहे.  धन्यवाद !

ज्ञानेश्वर मधुकर मिस्तरी
एकविरा फेब्रिकेशन,नाशिक

🅿1⃣🍂🅿1⃣🍂🅿1⃣🍂🅿1⃣

♻ *प्रेरणा एक सुवर्णपान फेसबुक पेज*
https://m.facebook.com/preranaeksuvarnpan/

⚜🎯⚜🎯⚜🎯⚜🎯⚜🎯⚜

♻ *Email प्रेरणा एक सुवर्णपान*
preranaeksuvarnpan@gmail.com

♻ *whatsapp प्रेरणा एक सुवर्णपान*
भरत पाटील- 9665911657

🔮🎇🔮🎇🔮🎇🔮🎇🎇🔮🎇

*प्रेरणा एक सुवर्णपान Broadcast ला ॲड व्हायचे असल्यास 9665911657  नंबरवर whatsapp करा.दर पंधरवाड्यात दीपस्तंभ आपल्या भेटीला...स्वअनुभव रेखाटत*

♻🔮♻🔮♻🔮♻🔮♻🔮♻